सांधण व्हॅली येथे माउंटन एज अॅडव्हेंचर्सचा ११८ वा ट्रेक उत्साहात
आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाची दरी
पिंपरी : आशिया खंडामधील दुसर्या क्रमांकाची सर्वात खोल दरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांधण दरी येथे तळेगाव येथील माउंटन एज अॅडव्हेंचर्स या संस्थेने ट्रेक आयोजिला होता. निसर्गाच्या कुशीत दडलेली ‘सांधण दरी’ हे आश्चर्य आजही आपल्यापैकी अनेकांच्या नजरेपासून दूर आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की, कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नाही. समोर आजोबा डोंगर, रतनगड आणि मागे अलंग-मदन -कुलंगगड आणि कळसूबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही. सांधण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळजवळ ४ किमी लांबवर पसरलेली आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यानंतर सहभागी सर्व ट्रेकर्सनी या ट्रेकचा मनमुरादपणे आनंद लुटला.
या ट्रेकचे नियोजन संस्थेचे ट्रेक लिडर मंदार थरवल, मनोज राणे, अनिल जाधव व संजय निकाळजे यांनी केले होते. ट्रेकदरम्यान सांधण दरीबद्दल सर्व माहिती देण्यात आली होती व एकूण ३५ ट्रेकर्स सहभागी झाले होते. येणार्या काळामध्ये सह्याद्रीतील आणखी ट्रेक आयोजिण्यात येणार असल्याचे माउंटन एज अॅडव्हेंचर्स ग्रुपचे मुख्य रोहित नागलगाव
यांनी सांगितले.