उद्धव ठाकरेंनी दिलेल्या जाहीर आव्हानाला शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आमच्यामुळे अडीच वर्षानंतर…”
मुंबई | Sandipan Bhumare On Uddhav Thackeray – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागतं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला (Shinde Group) दिलं आहे. तसंच मर्दांच्या हाती मशाल आहे असंही यावेळी ते म्हणाले. छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित षण्मुखानंद सभागृहात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत होते. यादरम्यान आता उद्धव ठाकरेंच्या या जाहीर आव्हानाला शिंदे गटानं प्रत्युत्तर दिलं आहे.
शिंदे गटातील संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला उत्तर दिलं. “आम्हीपण मैदानातच आहोत, घरात बसलेलो नाही. हे अडीच वर्ष घरात बसले होते, तेव्हाही आम्ही मैदानात होतो आणि आत्ताही आहोत. हे आमच्यामुळे अडीच वर्षानंतर मैदानात आले आहेत. ही क्रांती झाली नसती तर अजून अडीच वर्ष घरातच बसून राहिले असते. कोण कोणाला काय दाखवतं हे अडीच वर्षानंतर कळेलच”, असं संदीपान भुमरे म्हणाले.
दरम्यान, “प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागतं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यापेक्षा एका मैदानात व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे”, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं आहे.