सांगलीत राष्ट्रवादीच्या गटबाजीने कुटुंबात दुफळी; ‘हे’ पिता-पुत्र एकमेकांविरोधात उभे टाकणार?

Sangli Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार गट अशी पक्षाची विभागणी झाली. याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सांगली जिल्ह्याही अपवाद नाही. पक्षातील हे दोन गट आता नेत्यांपुरतेच मर्यादित राहिले नाहीत. या फुटीने अनेक घरांचे उंबरेही ओलांडल्याची उदाहरणे आहेत. यातूनच सांगली जिल्ह्यातील दोन पुत्रांची वाटचाल ही आपल्या पित्यांच्या विरोधात झाली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे सांगली जिल्ह्यातील आहेत. आत्तापर्यंत राष्ट्रवादीची मोट जयंत पाटील यांनी चांगल्या पद्धतीने बांधली आहे. निष्ठावंत कार्यकर्ते आपल्यासोबत ठेवण्यात ते सध्या तरी यशस्वी होते; पण राष्ट्रवादी फुटली तशी जिल्ह्याजिल्ह्यांत दोन गट तयार झाले. त्याची झळ सांगलीतील राजकीय कुटुंबालाही बसली आहे. जिल्ह्यातील दोन मातब्बरांना, माजी मंत्री असलेल्यांना या फुटीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
विट्याचे माजी आमदार सदाशिव पाटील हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील यांचे निष्ठावंत आहेत. सध्या सदाशिव पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली नसली तरी ते शरद पवार यांच्या बाजूने असल्याचे बोलले जाते, पण त्यांचे पुत्र विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत आहेत. त्यांनी नुकतीच अजितदादांची भेट घेतलेली आहे. दुष्काळाबाबत भेट घेऊन त्यांनी अनेक मागण्या आणि तुमच्यासोबत राहण्याचे आश्वासन दिले आहे. वैभव पाटील हे त्यांचे वडील माजी आमदार सदाशिव पाटील यांचे बऱ्यापैकी काम पाहत असतात. पण या दोन भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.