अभिमानास्पद! सांगलीच्या संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाला घातली गवसणी

लंडन | Commonwealth Games 2022 – इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या काॅमनवेल्थ स्पर्धेत भारतानं पहिलं पदक मिळवलं आहे. वेटलिफ्टर संकेत महादेव सरगर याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. त्याने 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोग्राम वजन उचलत ही कामगिरी केली आहे. यावेळी मलेशियाच्या मोहम्मद याने 249 किलोग्राम वजन उचलत सुवर्णपदक मिळवलं आहे.
सांगली जिल्ह्यातील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील आर्टस् अॅण्ड कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी संकेत सरगर याची बर्मिंगहॅम (इंग्लड) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघामध्ये निवड झाली होती. वेटलिफ्टिंगमध्ये अशी निवड होणारा संकेत महाराष्ट्रातील पहिला खेळाडू होता. आता त्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदक पटकावून सांगलीचे तसंच महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.
संकेतला क्लीन अँड जर्क प्रकारात पहिल्या प्रयत्नात 135 किलो वजन उचलण्यात अपशय आले होते. मात्र त्याने दुसऱ्या प्रयत्नात यशस्वीरित्या 135 किलो वजन उचलत जोरदार पुनरागमन केलं. एकूण 248 किलो वजन उचलून त्याने पुन्हा एकदा सुवर्ण पदकाच्या रेसमध्ये आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीत मात्र त्याचा 139 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्न फसला. त्याच्या हाताला दुखापत देखील झाली. त्यानंतरही त्याने 141 किलो वजन उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तरी देखील तो सुवर्ण पदकाच्या रेसमध्ये होता. मात्र मलेशियाच्या मोहम्मदने संकेतपेक्षा एक किलो वजन जास्त उचलत अखेरच्या क्षणी संकेतकडून सुवर्ण पकद हिसकावले.