निवृत्तीची घोषणा करणाऱ्या सानिया मिर्झाबद्दल ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Sania Mirza Biography | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झानं (Sania Mirza) मोठी घोषणा केली आहे. सानियानं तिच्या व्यावसायिक टेनिस करिअरमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सानियानं हा निर्णय तिच्या दुखापतीमुळे घेतला आहे. तसंच ती पुढील महिन्यात दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे. ही चॅम्पियनशिप तिची शेवटची स्पर्धा असणार आहे. (Sania Mirza Retirement)
सानियाबाबत काही खास गोष्टी
1. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेल्या सानिया मिर्झाला 2006 मध्ये ‘पद्मश्री‘ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ती हा मान मिळवणारी सर्वात कमी वयाची खेळाडू आहे.
2. सानियानं आपलं शिक्षण खेरताबादमधील नसार स्कूलमधून घेतलं आहे. तिच्या वडिलांनी तिला हैदराबादच्या निजाम क्लब ऑफ हैदराबादमध्ये दाखल केलं होतं. मात्र, क्लबच्या प्रशिक्षकानं ती लहान असल्यामुळे तिला शिकवण्यास नकार दिला होता. पण तिच्या वडिलांच्या विनंतीनुसार प्रशिक्षकांनी सुरूवातीला ती कशी खेळते हे पाहिलं. त्यानंतर एका आठवड्यानंतर सानियाची खेळी पाहून प्रशिक्षकानं सानियाच्या आई-वडिलांना बोलावलं आणि तिच्या टेनिस कौशल्याची प्रशंसा केली आणि तिचं प्रशिक्षण सुरू केलं.
3. सानियाला टेनिसचे प्रशिक्षण देणारे तिचे पहिले गुरू हे महेश भूपती आहेत. सिकंदराबाद येथील ‘सिनेट’ टेनिस अकॅडमीमधून तिनं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर ती अमेरिकेतील ‘एस टेनिस अकॅडमी’मध्ये दाखल झाली.
4. 1999 मध्ये सानियानं जकार्ता येथे आपल्या कारकीर्दीची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली होती. तसंच वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिनं भारताचं शानदार प्रतिनिधित्व केलं.
5. सानियानं 2002, 2006, 2010 आणि 2014 मध्ये विविध खेळांमध्ये अनुक्रमे 2 सुवर्ण, 5 रौप्य व 7 कांस्यपदके मिळविली आहेत. तसंच एफ 2012 राष्ट्रकुल स्पर्धेत तिनं महिला एकेरीत रौप्य पदक आणि महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकलं आहे.
6. सानिया ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट टेनिसपटूंपैकी एक मानली जाते. ती बर्याच वर्षांपासून भारताची प्रथम क्रमांकाची टेनिसपटू आहे.
7. 12 एप्रिल 2010 रोजी सानियानं पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्नगाठ बांधली. हैदराबादच्या ताज कृष्णा हॉटेलमध्ये पारंपारिक मुस्लिम विधीनुसार तिनं लग्न केलं आहे. ज्यामध्ये तिला पाकिस्तानी वैवाहिक प्रथेनुसार शोएबच्या कुटुंबाला 6.1 दशलक्ष रुपये द्यावे लागले. नंतर त्यांचा वलिमा सोहळा पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आयोजित करण्यात आला होता.
8. शोएब मलिक हा एक पाकिस्तानी नागरिक असल्यानं सानियाला या लग्नाबाबत लोकांकडून बरीच टीका सहन करावी लागली होती. यासह तिच्या भारताच्या नागरिकत्वाच्या प्रश्नावरही बरेच वादंग झाले होते. तेलंगणाच्याच राज्यसभेत तिला पाकिस्तानी बहु घोषित करण्यात आलं होतं. तसंच लग्नानंतर 2018 मध्ये तिनं इजहान मिर्झा मलिक नावाच्या मुलाला जन्म दिला. जेव्हा सानियाचं लग्न झालं होतं तेव्हा ती सर्वात जास्त शोधली जाणारी महिला टेनिसपटू आणि 2010 ची सर्वोत्कृष्ट भारतीय महिला खेळाडूही ठरली.
9. 2008 मध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान सानियानं तिरंगी ध्वजाजवळ पाय ठेवला होता, त्यामुळे लोकांकडून तिला टीकेचा सामना करावा लागला होता. तर तिच्याविरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी यांनीही कलम 2 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
10. दुबई टेनिस चॅम्पियनशिप ही सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असणार आहे. 19 फेब्रुवारीपासून ही दुबई टेनिस चॅम्पियनशिप सुरू होणार आहे. हा WTA 1000 कार्यक्रम असेल. या स्पर्धेत सानिया शेवटच्या वेळी तिच्या चाहत्यांना खेळताना दिसणार आहे.