जालना हिंसाचाराचे सुत्रधार संभाजी भिडे; मराठा समन्वयक संजय लाखेंचा गंभीर आरोप

जालना : (Sanjay Lakhe On Sambhaji Bhide) जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मराठा आंदोलनाला हिंसाचाराचं स्वरुप मिळलं. पोलिसांना आंदोलकांवर लाठीहल्ला केला अन् आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे राज्यभर वातावरण पेटलं. या प्रकरणातील नवीन खुलासा समोर आला आहे. तो म्हणजे अंतरवालीच्या मराठा आंदोलनामध्ये ज्यांनी उद्रेक केला त्यात संभाजी भिडेंचे कार्यकर्ते होते, असा आरोप जालना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.
पुढे बोलताना लाखेंनी म्हटलंय की, आजपर्यंत मराठा समाजाने जेवढी आंदोलने केली ती सर्व शांततेच्या मार्गाने करण्यात आली आहेत. मराठा आंदोलनात उद्रेक करणारे संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते होते. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घ्यावेत. तसे न केल्यास शासन आपल्या दारी कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक बसू, असा इशारा त्यांनी दिला.
लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले याची चौकशी झाली पाहिजे, असं म्हणत संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांनी जालन्याच्या आंदोलनामध्ये उद्रेक केला, असा थेट आरोप संजय लाखे पाटील, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक जालना यांनी केला आहे.