“…तर सरकारनं विरोधी पक्षांना भाषण लिहून द्यायचं होतं”, संजय राऊत संतापले
मुंबई | Mahavikas Aghadi Mahamorcha – महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज (17 डिसेंबर) राज्यातील विविध प्रश्नांवरुन मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. तसंच या मुंबईतील मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. हा मोर्चा शांततेत आणि नियमांचं पालन करुन काढावा असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. उद्याच्या मोर्चासाठी महाविकास आघाडीला पोलिसांनी काही अटींच्या आधारे परवानगी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरूषांबाबत होत असलेली वादग्रस्त वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मित्रपक्ष देखील सहभागी होणार आहेत. मात्र, या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काही अटींच्या आधारे मोर्चाला लेखी परवानगी दिली आहे. पोलिसांनी घातलेल्या या अटींवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांविरोधात मोर्चा काढला जात असताना आमच्यावरच अटी लादल्या जात आहे. अमुक शब्द भाषणात वापरू नये, असं बंधन घालण्यात आलं आहे. या सरकारनं या अटींपेक्षा आम्हाला भाषण लिहून द्यायचं होतं, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला आहे.
आज महाराष्ट्रप्रेमींचा मोठा मोर्चा निघणार आहे. त्यापूर्वीच सरकारचे पाय लटपटले आहेत. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा अपमान सुरू आहे. या अपमानाला विरोध करणाऱ्यांची अडवणूक सरकारकडून सुरू आहे. या मोर्चाला परवानगी देताना विविध अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, भाषणांबाबतही अटी घातल्या आहेत. त्यापेक्षा सरकारनं थेट भाषणंच लिहून द्यायला हवी होती. या सरकारमधील नेत्यांना भाषणं लिहूनच दिली जात आहेत, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.
One Comment