अजित पवार भाजपसोबत जाणार! दमानियांच्या दाव्यावर राऊत म्हणाले, “ते जाऊन मिंधेंप्रमाणे गुलामी करतील…”

मुंबई : (Sanjay Raut On Ajit Pawar) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. दमानिया यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
राऊत म्हणाले, “अजित पवार आता महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. ते स्वाभिमानी आहेत. त्यांचा कणा नेहमी ताठ असतो. बाणेदार असं नेतृत्व आहे. ते जाऊन मिंधेंप्रमाणे गुलामी करतील असं मला वाटत नाही. शेवटी प्रत्येकजण वैयक्तिक मतं घेत असतो. पण मी जे पाहतोय त्यानुसार अजित पवार हे मांडलिक म्हणून कुणाचं काम करतील असं मला वाटत नाही.”
“काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाविकास आघाडी ही फेविकॉलची जोड आहे. ही जोड तुटणार नाही आणि झुकणारही नाही”, असा दावा राऊत यांनी केला. “विरोधी पक्षनेते एकत्र होवू नये म्हणून, अशाप्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
“अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. राज्यामध्ये शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे भाज्या, धान्य, फळबागा नष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांचा खूप ठिकणी आक्रोश सुरु आहे. विरोधी पक्षनेत्याचं काम आहे की शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन प्रशासनासमोर मांडणं. त्यामुळे अजित पवार हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सह्याद्री अतिथीगृहावर गेले आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना भेटले”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.