“चंद्रकांत पाटलांच्या पोटातली मळमळ…”, संजय राऊतांचा टोला

मुंबई | Sanjay Raut On Chandrakant Patil – सध्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आहे. या विधानावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता चंद्रकांत पाटलांच्या याच विधानावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचं अभिनंदन करत खोचक टोला लगावला आहे.
काल (शनिवार) पनवेलमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती. या बैठकीच्या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. दु:ख झालं पण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता. केंद्राने आदेश द्यायचे आणि आपण ते मानायचे”. त्यांच्या याच विधानावरुन खळबळ वाजली. शेवटी भाजपाने या कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचं सांगत हे प्रकरण झाकायचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, “भाजपात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, देशातही हीच परिस्थिती आहे. पण मी चंद्रकांत पाटलांचं अभिनंदन करतो. पुण्यात राहत असताना, कोल्हापूरशी फारसा संबंध येत नसतानाही त्यांनी आपलं कोल्हापूरचं पाणी दाखवलंय आणि हे विधान केलंय. त्यांच्या पोटातली मळमळ ओठावर आली आहे. त्यामुळे त्यांना नंतर खुलासा करावा लागला. ही भाजपा कार्यकर्त्यांची भावना आहे, असं सांगावं लागलं”.