ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“पाकिस्तानात जाऊन बोलण्याची हिम्मत दाखवणं याला 56 इंचापेक्षाही…”, संजय राऊतांनी जावेद अख्तर यांची केली स्तुती

मुंबई | Sanjay Raut – पाकिस्तानमधील एका कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ कवी- गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना आरसा दाखवला आहे. यावेळी जावेद अख्तर म्हणाले की, “आम्ही मुंबईकर आहोत. आमच्या शहरावर हल्ला झाला ते आम्ही पाहिलं आहे. मात्र, त्या हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे एखाद्या भारतीयानं याबद्धल विचारलं तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.” अख्तर यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आहे. तसंच त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुकही होत आहे. यामध्ये आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जावेद अख्तर यांची स्तुती केली आहे.

“इथे बसून पाकिस्तानला सुका दम देणं ठीक होता है. पण तिकडे जाऊन बोलण्याची हिंम्मत दाखवणं याला 56 इंचापेक्षाही मोठी छाती आहे, असं मी मानतो.” असं म्हणत संजय राऊत यांनी जावेद अख्तर यांचं कौतुक केलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “जावेद अख्तर यांचं अभिनंदन फक्त मीच कशाला संपूर्ण देशानं केलं पाहिजे. त्यांचं अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनीही करायला पाहिजे. सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर निवडणुकीच्या अगोदर जो प्रकार झाला, त्यानंतर भाजपच्या (BJP) लोकांनी अनेक ठिकाणी फटाके वाजवले. जणूकाही जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नष्ट झाला. आम्हालाही आनंद झाला. पण ज्या प्रकारे जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या तोंडावर पाकिस्तानची धुलाई केली. याला एक हिंम्मत आणि धाडस लागतं. म्हणून भाजपनं आणि या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा त्यांच्या हिंमतीला दाद देऊन, त्यांचं अभिनंदन करणं आपल कर्तव्य आहे असं आम्ही मानतो आणि ते आम्ही केलं.” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

“आम्ही प्रत्यक्ष बोलूनही त्यांचं कौतुक केलं आणि आज सामनाच्या माध्यमातूनही हा विषय आम्ही समोर आणला आहे. जावेद अख्तर असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांच्यावर भाजपनं सातत्याने एका वेगळ्या पद्धतीनं टीका केली. जेव्हा ते अनेकदा परखड भूमिका मांडायला लागले तेव्हा त्यांना पाकिस्तानात चालते व्हा किंवा ते देशद्रोही आहेत असं म्हटलं गेलं. कारण, त्यांचा धर्म मुसलमान आहे. पण आज त्याच जावेद अख्तर यांनी एक साहित्यिक, लेखक, कवी म्हणून जाऊन लाहोरमध्ये फैज महोत्सवात त्यांना सुनावलं.” असंही राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये