“नारायण राणेंना बाईनं पाडलं बाईनं…”; अजित दादांच्या वक्तव्यावर संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, म्हणाले…
मुंबई | Sanjay Raut On Narayan Rane – सध्या शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. तसंच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शिंदे गटावर सडकून टीका करताना दिसत आहेत. आता संजय राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरून रीट्वीट केलेला एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाषणातला असून त्यामध्ये अजित पवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर मिश्किल भाषेत टिप्पणी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत राऊतांनी अजित दादांचा ‘कमाल की चीज’ असा उल्लेख केला आहे.
संजय राऊतांनी अजित दादांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की “दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र”, असं म्हणत राऊतांनी अजित दादांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
संजय राऊतांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओमध्ये अजित पवार नारायण राणेंविषयी मिश्किल शब्दांत टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित दादांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचा संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेनं केल्याचं विधान केलं आहे. “नारायण राणेंनीच शिवसेना (Shivsena) फोडली. सगळे पडले, राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईतील वांद्र्यात पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं बाईनं”, असं अजित पवार या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.
नेमकं काय घडलं होतं वांद्रे पोटनिवडणुकीत?
2015 मध्ये शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेनं तृप्ती सावंत यांना तिकीट दिलं होतं. तेव्हा तृप्ती सावंत यांच्याविरुद्ध नारायण राणेंनी मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला पराभूत करण्याची घोषणा केली होती. मात्र, तृप्ती सावंत यांच्याकडून राणेंना 20 हजार मतांनी पराभूत व्हावं लागलं होतं.