पुण्यात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

पुणे | सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस विचित्र घटना घडत आहेत. पुण्यातील औंध परिसरात एका बिल्डिंगमध्ये 3 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. पत्नी आणि मुलाचा खून करुन संगणक अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदीप्तो गांगुली (वय 44) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. सुदीप्तोने पत्नी आणि मुलाचा खून करुन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला.
सुदीप्तोचा भाऊ बंगळुरूमधील एका माहिती-तंत्रत्रान कंपनीत कामाला आहे. मंगळवारी त्याने सुदीप्तोला संपर्क साधला होता. त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने सुदीप्तोच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सुदीप्तोच्या भावाला संशय आला. सुदीप्तो, त्याची पत्नी, मुलगा प्रतिसाद देत नसल्याने भावाने तिघे जण बेपत्ता असल्याची तक्रार मंगळवारी रात्री चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दिली. सुदीप्तोच्या भावाचा मित्र पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने तक्रार नोंदविली होती. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांचे पथक औंधमधील सुदीप्तोच्या घरी पोहोचले. तेव्हा सुदीप्तोची पत्नी आणि मुलगा बेशुद्धावस्थेत पडले होते. सुदीप्तोने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सुदीप्तोची पत्नी आणि मुलाचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. दोघांचे चेहरे प्लास्टिक पिशवीने आवळल्याने त्यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.