मालिका खिशात! केएल राहुलच्या संयमी खेळीनं लंकादहन; भारताचा 4 गडी राखून विजय

कोलकाता : (India Vs Sri Lanka ODI Series 2nd Match 2023) नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारताने टी-२० पाठोपाठ आता वनडे मालिकाही सहजपणे खिशात घातली आहे. या मालिका विजयसह भारताने मिशन वर्ल्डकपची दमदार सुरुवात केली आहे. भन्नाट गोलंदाजी आणि सुमार फलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेवर चार विकेट्स राखून लंकादहन केलं. या विजयासह भारताने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेच्या २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कारण रोहित शर्मा, शुभमन गिल हे सलामीचे फलंदाज लवकरच बाद झाले. गेल्या सामन्यातील शतकवीर विराट कोहली या सामन्यात वाईट पद्धतीने क्लीन बोल्ड झाल्याचे पाहायला मिळाले. श्रेयस अय्यरला यावेळी मोठी खेळी साकारण्याची संधी होती, पण त्याला २८ धावांवर समाधान मानावे लागले. पण यावेळी एकामागून एक विकेट्स पडत असताना लोकेश राहुलने संयमीपणा दाखवत एका बाजून चांगला किल्ला लढवला आणि अर्धशतकासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताने टॉस जिंकला नसला तरी श्रीलंकेचा निर्णय भारताच्या पथ्यावर पडल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकेच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी चांगलेच जखडून ठेवले आणि त्यांच्या धावसंख्येला वेसण घातल्याने त्यांना केवळ 215 धावांवर शरणागती पत्कारावी लागली. फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने त्याने केले. कुलदीपने या सामन्यात तीन विकेट्स घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. त्यानंतर मोहम्मद सिराजनेही श्रीलंकेच्या शेपटाला गुंडाळले लंकादहन करण्यास मोलाची कामगिरी बाजावली.