बांगर म्हणाले ‘मुस्काटात मारा’, सुर्वे म्हणाले ‘तंगड्या तोडा’ आणि अजित पवार म्हणाले…

मुंबई : मुळातच हे शिंदे सरकार विधिमंडळ आणि लोकशाहीच्या चिंधड्या उडवत विश्वास घाताच्या बळावर स्थापन झालेलं आहे. सरकार सत्तेत येऊन काही दिवसच झाले. पण सत्ताधारी पक्षाचे आमदार धमकीची, मारामारीची भाषा करतात. बंडखोर आमदार संतोष बांगरांनी एका मॅनेजरला मुस्काटीत मारली तर इकडे मुंबईतील आमदार प्रकाश सुर्वे यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी देताना तंगड्या तोडा सांगितलं. महाराष्ट्रात चाललंय काय? सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली काय?”, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाच्या दबंगगिरी करणाऱ्या आमदारांना झापत हे शिंदे-फडणवीसांना मान्य आहे का? असा सवाल केला.
दरम्यान, राज्यातील पावसाळी अधिवेशन बुधवार दि. १७ रोजी सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी शिंदे सरकारकडून विरोधकांना चहापानाचं निमंत्रण दिलं होतं. यावर हे सरकार अविश्वासाच्या पायावर उभं असून सत्ता स्थापन करताना संविधानिक मुल्यांच्या चिंधड्या शिंदे-फडणवीसांना उडवल्या आहेत, असा हल्लाबोल करत या सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत, असं विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले, एक आमदार मॅनेजरला मुस्काटीत मारतो. दुसरे आमदार कार्यकर्त्यांना चिथावणी देताना गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण समोरच्यांना धडा शिकवा, तंगड्या तोडा, अशी भाषा वापरली जाते. एखाद्याला चूक लक्षात आल्यावर तो दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. पण इकडे माफी मागायची लांबची गोष्ट पण गुन्हे दाखल व्हायची वाट पाहतायेत. पोलिसांना माझं आवाहन आहे, या दबंगगिरी करणाऱ्या आमदारांवर तत्काळ गुन्हे दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली.