दऱ्या-खोऱ्यांतून २०० फुटांवरून कोसळणारा सवतसडा

चिपळूण : कोकण म्हटले, की आठवतो स्वर्ग. विविधतेने नटलेला, सौंदर्याने मढलेला हा कोकण प्रदेश. पावसाळ्यामध्ये तर कोकणाचे रूप अत्यंत खुलून दिसते. निसर्ग मुक्तहस्ताने उधळण करताना दिसतो. समुद्र, धबधबे, काजू आंबा, मासे याचा आनंद लुटण्यासाठी असंख्य पर्यटक कोकणात येत असतात. त्यातीलच म्हणजे चिपळूणचा सवतसडा धबधबा.
चिपळूण गावापासून अगदी जवळ म्हणजे ५ किमी अंतरावर हा सवतसडा कडा व त्यावरून पावसाळ्यात पडणारा हा सुंदर धबधबा आहे. मुंबईकडून चिपळूणला येताना महामार्गाच्या डाव्या बाजूला हा धबधबा उंचावरून कोसळताना दिसतो. सवतसड्याच्या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी शनिवार-रविवार येथे पर्यटकांची गर्दी असते. जुलै ते ऑक्टोबर या काळात धबधब्याला भरपूर पाणी असते. मात्र पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह खूप जोरात वाहात असल्याने इथे वावरताना काळजी घेणे योग्य. येथे पर्यटकांसाठी धबधब्यापर्यंत जाण्याकरिता पाऊलवाट असून विश्रांतीसाठी शेडची सोय करण्यात आली आहे.
सुमा २०० फुटांवरून कोसळणारा धबधबा अतिशय विलोभनीय असून पर्यटकांना आकर्षित करतो. चिपळूण पासुन ३-४ किमी अंतरावर मुंबई-गोवा महामार्गालगत हा धबधबा आहे.जवळच विसावा पॉईंट आणि परशुराम मंदिर ही पर्यटनस्थळे आहेत.