इतरताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रशिक्षण

गेस्ट हाऊसमध्ये सुरक्षारक्षकांचे ‘वऱ्हाड’…!

राष्ट्र संचार न्यूज नेटवर्क
पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे विद्यापीठ विभिन्न धक्कादायक कारणांसाठी चर्चेत आहे. आता पुन्हा विद्यापीठत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) रूपांतर मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये कसे होत आहे याची प्रचिती गेल्या काही दिवसांपासून येत आहे. राजकीय पाहुणे, सिनेट, मॅनेजमेंट कौन्सिल आणि प्राध्यापकांसाठी असलेल्या व्हीआयपी गेस्ट हाऊसमधील १२ खोल्या लग्नाच्या वऱ्हाडासाठी बुक केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Dr Suresh Gosavi) यांच्या तोंडी आदेशानंतर या खोल्या बुक केल्यामुळे मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य आणि प्राध्यापकांची गैरसोय झाल्यामुळे त्यांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
सुरक्षा विभागप्रमुखांच्या कुटुंबात विवाह समारंभ आहे. विवाहस्थळ विद्यापीठ (University) आवाराच्या बाहेर असले तरी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, पाहुण्यांसाठी विद्यापीठातील व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये तब्बल १२ खोल्यांचे बुकिंग करण्यात आले आहे.
काही प्राध्यापक, सिनेट सदस्य गुरुवारी मॅनेजमेंट कौन्सिल बैठकीसाठी आले होते.पुणे जिल्ह्यासह नगर आणि नाशिकवरून आलेल्या सदस्यांची गैरसोय झाल्यामुळे हा विषय थेट मॅनेजमेंट कौन्सिल (Management Council) च्या बैठकीत उपस्थित झाला. मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्राध्यापक संदीप पालवे यांनी विवाह समारंभासाठी दोन ते तीन दिवस गेस्ट हाऊस वापरणे ठिक आहे. परंतु आठ दिवस खोल्या का बुक केल्या आहेत. कोणाच्या आदेशानुसार खोल्यांची बुकिंग झाली आहे. त्याचे भाडे नेमके कोण भरणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. परंतु कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देणे टाळले. विद्यापीठाचे गेस्ट हाऊस मॅनेजर ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याकडे गेस्ट हाऊस बुकिंग संदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. तसेच कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर (Dr Parag Kalkar)आणि प्रभारी कुलसचिव डॉ.ज्योती भाकरे (Dr Jyoti Bhakre) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये