
पुणे SCHOOL CHILDRENस HELPING : इंडस इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववीत शिकणार्या राजवीर जाधव आणि रोनित लाहोटी या दोन विद्यार्थ्यांनी साधू वासवानी मिशनच्या ‘शेअर टू केअर’ उपक्रमांतर्गत कौतुकास्पद काम केलं आहे. बालवाडी ते प्रथमवर्ग पदवीचे शिक्षण घेत असलेल्या ५८० गरजू विद्यार्थ्यांना स्टेशनरी आणि नोटबुक्स आदी शालेय साहित्य दिले. दुर्दम्य इच्छाशक्ती असूनही परिस्थिती आणि साधनांअभावी शिक्षणापासून वंचित राहणार्या मुलांना मिळालेल्या योग्य मदतीमुळे बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्व. डॉ. मिनू मेहता नगर सोशल सर्व्हिस सेंटर, शांताई आणि महिला सेवा मंडळ या संस्थांच्या वतीने अशा प्रकारच्या गरजू विद्यार्थ्यांना मदत आणि सहकार्य मिळवून दिले जाते. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य ती शिक्षण साधनं गरजूंपर्यंत पोहोचवणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ‘रोनित आणि राजवीर यांची आपल्यासारख्याच शाळकरी मित्रांसाठी मदतीला धावून जाण्याची ही कृती अत्यंत प्रेरणादायी आणि गौरवास्पद असून, या लहानग्यांच्या उपक्रमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
इतरांनी यापासून प्रेरणा घ्यावी’, असे आवाहन या संस्थांच्या वतीने करण्यात आले. एकमेकांची काळजी घेण्याचे संस्कार रुजविण्याचा मिशनचा प्रयत्न आहे. रोनित-राजवीर यांनी स्वयंप्रेरणेतून आणि अत्यंत विनम्र भावनेतून ही कृती केली. विशेष म्हणजे अशा प्रकारचे कार्य पुढेही चालू ठेवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ही केवळ सुरुवात आहे.
रोनित-राजवीरसारख्या मुलांच्या हातून भविष्यकाळात असे अशी अनेक चांगली कामे होतील यात संशय नाही, अशी प्रतिक्रिया मिशनच्या वतीने देण्यात आली.