लायन्स क्लब ऑफ ओतूरचा उपक्रम – खगोलशास्त्र प्रयोगशाळेतून होणार अवकाशाचीही सफर

ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात ग्रामीण भागातील पहिल्या खगोलशास्त्रीय प्रयोगशाळेचे नुकतेच उद्घाटन झाले. यातून विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ ओतूर सेलिब्रेशन्स यांच्या विद्यमाने चैतन्य विद्यालयात उत्तर पुणे जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालयात आणि विशेषतः ग्रामीण भागात पहिली खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापित झाली आहे. विद्यार्थ्यांना या अद्ययावत प्रयोगशाळेतून आता अवकाशाची सफर होईल.
अवकाशगंगा, सूर्य, चंद्र, तारे, राशी, ग्रह इत्यादींची सफर घडवून आणण्यासाठी या लायन्स क्लबने या प्रयोगशाळेचा संकल्प केला होता. प्रयोगशाळेमध्ये खगोलशास्त्रासंदर्भात विविध प्रकारची निऑनची भित्तीचित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांची अवकाशाबरोबर मैत्री घडवून आणण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना या विषयाची गोडी लागून त्यांच्यातून नवोन्मित शास्त्रज्ञवृत्ती वृद्धिंगत होण्यासाठी या उपक्रमाचे प्रयोजन आहे.
अवकाशात अनेक अशा काही गोष्टी आहेत, रहस्य आहेत, त्यांचा उलगडा होण्यासाठी या प्रयोगशाळेचा आता उपयोग होणार आहे. अवकाशीय घटनांची विद्यार्थ्यांना उकल होण्यासाठी विविध प्रकारची ८ खगोलीय उपकरणे व अवकाश निरीक्षणासाठी हायटेक्नॉलॉजीची खगोलीय दुर्बीण प्रयोगशाळेत बसवण्यात आली. मुलांना नेहमीच मार्गदर्शन करता यावे, यासाठी अद्ययावत दूरदर्शन संच लावण्यात आला.
अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ ओतूर सेलिब्रेशनचे अध्यक्ष पी. एम. जे. एफ. ला. विवेक जे. पानसरे होते. द्वितीय उपप्रांतपाल पी. एम. जे. एफ. लायन परमानंद शर्मा, झोन अध्यक्ष लायन प्रकाश मुटके, लायन डॉ. सीमा पानसरे-शिंदे, लायन डॉ. रमेश जाधव, आदी उपस्थित होते. ‘‘सौ. निर्मला व जयसिंग पानसरे खगोलशास्त्र प्रयोगशाळा’’ असे नाव देण्यात आले.