“काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो…”, उदय सामंत यांचं सूचक ट्विट

मुंबई | Uday Samant – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत चांगलीच फुट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. तसंच शिंदे गटानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरही दावा केला. मात्र, निवडणूक आयोगानं या दोन्ही गोष्टी गोठवल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर आज (19 ऑक्टोबर) सकाळी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांना उद्देशून एक विनंती केली आहे. पण हे काही नेते नेमके कोण? याचा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केलेला नाही. त्यामुळे सामंतांनी केलेल्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
“महाराष्ट्रातील काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो. राजकारणामध्ये टीका-टिपण्णी होत असते. पण टीका करताना आपण जी पातळी गाठतोय, ती योग्य आहे असं वाटत नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत जनतेचा आहे. भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल, अशी वक्तव्य होऊ नयेत अशी माझी नम्र विनंती”, असं उदय सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.