सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सात जोडपी विवाहबद्ध

ओतूर : श्रीक्षेत्र ओझर येथे बुधवारी सात विवाहाचा पहिला ग्रुप संपन्न झाला. सकाळी १०.३० वा. गणेश पूजन श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, विश्वस्त बी. व्ही. अण्णा मांडे, आनंदराव मांडे, देवस्थान ट्रस्टचे माजी खजिनदार किसन मांडे, यजमान नीलेशराव चव्हाण, ग्रामस्थ दत्तात्रय ठुबे, रघुनाथ कवडे, बाळासाहेब टेंभेकर, दगडूनाना मांडे यांच्या हस्ते करण्यात आले. साखरपुडा व टिळा असा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये कार्यक्रमाच्या शेवटी वधूवरांना स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही व करून देणार नाही अशी शपथ देण्यात आली. ११.३० ते ३.०० वाजेपर्यंत वर्हाडी मंडळींना विशेष रुचकर भोजन देण्यात आले. काळवाडी येथील महिला बचतगटाच्या ४० महिलांनी वाढप्याचे काम केले. वर्हाडी मंडळींसाठी आरओ प्लँटचे शुद्ध पाणी पंगतीमध्ये व दिवसभर पिण्यासाठी पुरवण्यात आले.
वधुवरांना सुरुची असे भोजन देण्यात आले. तीन हजार वर्हाडी मंडळींनी जेवणाचा आस्वाद घेतला, वधुवरांना स्वतंत्र जानुसवाडे, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह अशा सुविधा पुरविण्यात आल्या. पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. नवरदेवांची मिरवणूक श्रींच्या मंदिराकडे दर्शनासाठी नेऊन सनईच्या मंगलस्वरात व्यासपीठाकडे आगमन झाले. याप्रसंगी वधुवरांना विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, विश्वस्त गणपत कवडे, कैलास मांडे, मिलिंद कवडे, मा.अध्यक्ष शाकुजी कवडे, शिरोली गावचे सरपंच प्रदीप थोरवे, विघ्नहर स.सा.का. व्हा. चेअरमन अशोक घोलप, जुन्नर तालुका परिट समाज अध्यक्ष पपू दळवी, अॅड.संजय टेंभे, लक्ष्मण शेरकर यांनी शुभाशीर्वाद दिले.
या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ माडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त बी.व्ही.अण्णा मांडे, रंगनाथ रवळे, आनंदराव मांडे, किशोर कवडे, मंगेश मांडे, विजय घेगडे, श्रीराम पंडित, सौ राजश्री कवडे, मा.जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांची लाभली. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक विवाह संपन्न झाला. विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन मा. सरपंच जगन्नाथ कवडे यांनी केले. गोरज मुहूर्तावर कुलस्वामी पारवे यांनी मंगलाष्टके गायन करून विवाह संपन्न झाले.