…अन् शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या फोनवरून कार्यकर्त्यांशी साधला संवाद; म्हणाले, “माझा तुम्हाला आग्रह आहे की…”

मुंबई | Sharad Pawar – आज (2 मे) शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांनी अचानक केलेल्या घोषणेमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नेते आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
शरद पवारांनी त्यांचा निर्णय मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत शरद पवार त्यांचा निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून जाणार नसल्याचं उपोषणकर्त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांच्याशी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी संवाद साधला. तसंच त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली. मात्र, कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी तिथूनच शरद पवारांना फोन केला. त्यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
“आत्ता तुम्ही सगळे तिथे बसला आहात. पण माझा तुम्हाला आग्रह आहे की तुम्ही सगळ्यांनी आधी जेवण करा. त्यानंतर मी तुमच्या सर्वांशी बोलायला येईन”, असं शरद पवार म्हणाले. त्यावेळी कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी सांगितलं की, आम्ही हेच सांगायला आलो होतो पण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना ऋणानुबंध या ठिकाणी जायला सांगितलं.