भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले; “फक्त माफी मागून चालणार नाही तर…”
मुंबई : (Sharad Pawar On Mohan Bhagwat) बुधवार दि. 5 रोजी नागपूर येथिल दसरा मेळाव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. ते म्हणाले, “मधल्या काळात मनुष्याने मान खाली घालावी, अशा पद्धतीने आपण आपल्याच लोकांना वागवले, हे देखील खरं आहे. या चुका आपण कबूल करायला हव्यात. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांचे, पापाचे क्षालन करायलाच हवे,” असं मोहन भागवत यांनी ब्राह्मण समाजाला उद्देशून म्हटलं.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “समाजातील एका गरीब वर्गाला काही काळ खूप यातना सहन कराव्या लागल्या, त्या घटकांना याची जाण व्हायला लागली, या गोष्टीचं समाधान आहे, हा योग्य बदल असला तरी केवळ माफी मागून चालणार नाही, तर व्यवहारातही आपण या सगळ्या वर्गासंबंधी भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, असं म्हणत पवार यांनी मोहन भागवत यांना टोला लगावला आहे.
भागवत म्हणाले होते, ‘सामाजिक समता हा आपल्या परंपरेचा भाग होता. सर्व धर्मांच्या आचार्यांनी त्यांच्या शास्त्रांमध्ये विषमतेला, उच्च-नीच्चतेला, अस्पृश्यतेला विरोध असल्याचे जाहीर केलं आहे. जातिभेदाचे समर्थन कधीही करता येणार नाही. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांचे, पापाचे क्षालन करायलाच हवे,’ असे भागवत यांनी म्हटलं होतं.