ताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणीत हिंसा भडकली; शहरात संचारबंदी लागू, इंटरनेट सुविधाही बंद

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची काच मनोरुग्णाने फोडली होती. त्यावरून संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांसमक्ष या व्यक्तीला अमानुष मारहाण केली. पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा जीव वाचला. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली होती. सोपान दत्तराव पवार (४५) असे आरोपीचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीवरील काच फुटल्यानंतर कपड्याने ही प्रतिकृती झाकून ठेवण्यात आली आहे.

परभणीमध्ये आज बुधवारी आंबेडकरी अनुयायांकडून बंद पुकारण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. परंतु, या आदेशाला न जुमानता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी दुपारी 1 वाजेपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहील, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने एका पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

परभणीतील बंदला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून शहरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. मात्र, जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

दरम्यान, आंदोलकांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. अनेक महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनीही पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. परभणी बंद असताना जी दुकाने सुरू होती, अशी दुकाने आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडला.

परभणी शहरातील सात ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. अनेक ठिकाणी बॅनरची तोडफोड करून रस्त्यावर पेटून देण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण आले असून ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून परभणीतील रस्त्यावर मार्च काढण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये