“…हे शिवसैनिक सहन करणारच नाही”; शिवसेना नेत्याचा शिंदे गटातील नेत्यांना इशारा
पुणे : शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यापासून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते अनेकवेळा आमनेसामने येताना दिसत आहेत. मंगळवारी सायंकाळी शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. हल्ल्यात उद्या सामंत यांच्या गाडीची काच शिवसैनिकांनी फोडली होती. गद्दार शब्दांत निषेध करत शिवसैनिकांनी सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला होता.
हल्ल्यानंतर सामंत यांनी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. पोलिसांनी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखीओलो खेतले. त्यांनी माध्यमांशी संवाद साधून आमची हत्या करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं आहे. आम्ही भूमिका बदलली. लोकशाही आम्हाला कोणाला पाठींबा द्यायचा याचा अधिकार देते. मात्र, काही लोकांना ते पटत नाहीये. ते आमच्यावर हल्ले करण्यासाठी कार्यकर्त्यांना उकसवत आहेत. अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या हल्ल्यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटातील नेत्यांना इशारा दिला आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, “हल्ल्याचं समर्थन मी करणार नाही. पण हल्ले का होतात? जो तो फुटीर आमदार उठतो आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर बोलतो. एक तर तुम्ही फुटले, त्यात तुम्ही पक्षांच्या नेत्यांबद्दल उलटं बोलता. हे शिवसैनिक सहन करणारच नाही.” अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली. “आम्ही काहीही करू शकतो” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
उदय सामंत यांच्यावर बोलतानाच खैरे यांनी तानाजी सावंत यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, तानाजी म्हणतो मी आदित्यला ओळखत नाही. पण मागे मागे फिरायचा तो आदित्य ठाकरेंच्या. तानाजी आता आदित्य ठाकरेंबद्दल बोलतो, उद्धव ठाकरेंबद्दल बोलतो. कशा करता बोलतो? तुमचीसुद्धा कोणत्या न कोणत्या सरकारच्या काळात ईडी चौकशी होईलच. अशी टीका खैरे यांनी सावंत यांच्यावर केली.