सत्तासंघर्षाची मोठी घडामोड; ‘धनुष्यबाण’ चिन्हासाठी शिवसेनेची दिल्ली उच्च न्यायालयात धाव!
नवी दिल्ली : (Shiv Sena petition in Delhi High Court) अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने हंगामी शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील न्यायालयीन लढाई सुरु आहे. यासंदर्भात आज मोठी घडामोड घडली असून दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. शिवसेनेतले ४० आमदार शिंदे गटामध्ये सामील झाले. त्यानंतर झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये खरी शिवसेना कुणाची हा पेच निर्माण झाला होता.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव दिलं. तर ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळालं. हा तात्पुरता निर्णय होता. त्यामुळे ठाकरे गटाकडून नावासंदर्भात आणि चिन्हासंदर्भात वाद सुरुच आहे.
दरम्यान, दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोगाने चिन्हाबाबत निर्णय देण्यापूर्वी ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयात कोर्टाने हस्तक्षेपासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावरील सिंगल बेंचच्या कोर्टाने अशा हस्तक्षेपाला नकार दिला होता. सिंगल बेंचच्या या आदेशाला उद्धव ठाकरे यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये आव्हान दिले आहे. निवडणूक आयोग्याच्या आदेशात हस्तक्षेप करुन योग्य तो निर्णय व्हावा, अशी ठाकरे गटाची मागणी आहे.