‘बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा’, मुंबईत शिवसेनेचा नवा नारा!
मुंबई : (Shiv Sena released new poster) पालिकेत आपलं वर्चस्व पुन्हा एकदा ठेवण्यासाठी शिवसेना तयारीला लागली आहे. यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर देखील त्यांच्याकडून वारंवार होताना पाहायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने टॅगलाईनवर मोठ्या प्रमाणात पक्षाचं लक्ष असल्याचं दिसत आहे. ‘बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा’, असा शिवसेनेचा नवा नारा असणार आहे.
दरम्यान, आज शिवसेनेच्या गटप्रमुखांसाठी आयोजित मेळाव्यासाठी नेस्को मैदानात भव्य तयारी करण्यात आली आहे. यावेळी एक फ्लेक्सची प्रचंड चर्चा सभास्थळी पाहिला मिळाली. शिवसेनेने या आधी देखील टॅग लाईनच्या माध्यमातून विरोधकांना जेरीस आणल्याच पाहिला मिळालं आहे. नुकतेच 40 बंडखोर आमदारांना पन्नास खोके एकदम ओक्के, गद्दारांना माफी नाही, माझं कुटुंब माझी जबाबदारी, पुढे चला मुंबई, पन्नास खोके एकदम ओके, स्वतःला खोके महाराष्ट्राला धोके, महाराष्ट्राच्या विकासाचा मी शिलेदार, आता येतय माझं सरकारं, मुंबई में जेलेबी ने फाफडा उद्धव ठाकरे आपडा अशा आशयाच्या घोषणा आणि फ्लेक्स पाहिला मिळाले होते.
निवडणूक प्रचारात सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही फार प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला पुन्हा संधी मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यासाठी सेनेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.