बीबीसीच्या मुंबई-दिल्ली कार्यालयातील आयकर विभागाचं सर्वेक्षण 3 दिवसांनंतर संपले

नवी दिल्ली : (The income tax department of the BBC’s Mumbai-Delhi office is over) बीबीसीच्या दिल्ली कार्यालयातील आयकर विभागाचे सर्वेक्षण तीन दिवसांनंतर संपले आहे. 14 फेब्रुवारीपासून दिल्ली आणि मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागांच्या अधिकाऱ्यांनी येऊन सर्व्हे केला. हे सर्वेक्षण 16 फेब्रुवारीला रात्री संपलं आहे.
14 फेब्रुवारीला सकाळी 11.30 च्या सुमारास बीबीसीच्या भारतातील दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण सुरू झाले होते. या सर्वेक्षणात बीबीसीनं आयकर विभागाला पूर्णपणे सहकार्य केलं आहे.
बीबीसीचे प्रवक्त्यांनी सांगितले, “आयकर विभागाचे अधिकारी दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयातून बाहेर पडले आहेत. आम्ही त्यांना यापुढेही सहकार्य करत राहू आणि आशा करतो की ही परिस्थिती निवळेल. आम्ही चौकशीला सहकार्य केले. काही जणांना प्रश्नोत्तरासाठी बराच काळ थांबावे लागले, काहींना रात्री देखील थांबावे लागले. त्यांची प्रकृती चांगली राहणे याला आमचे प्राधान्य आहे. आमची वृत्तप्रसारण सेवा पूर्ववत सुरू झाली आहे आणि आम्ही आमच्या भारतीय प्रेक्षकांच्या, वाचकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत.
“बीबीसी एक विश्वासार्ह आणि स्वतंत्र माध्यम कंपनी आहे. आम्ही आमचे कर्मचारी आणि पत्रकारांच्या पाठीशी आहोत, जे कुठलीही भीती अथवा वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता भविष्यात वृत्तांकन करतील,” असे बीबीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.