नड्डांना शिवसेनेने करुन दिली, बाळासाहेबांनी मोदींवर केलेल्या उपकाराची आठवण!

मुंबई : (Shivsena On J P Nadda) सध्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शिंदे गटात सहभागी होत आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. अशातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेनेसह देशातील इतर प्रादेशिक पक्ष संपणार असल्याचा दावा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचलं.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की, भाजपच राहील व बाकीचे सगळे संपतील. मराठीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही! त्यामुळे भाजपनं लक्षात ठेवावं कावळ्याच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल आणि शाप देणारे कावळे नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजप नेतृत्वाला इशारा दिला आहे.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ साली झालेल्या दंगलीनंतर ते चांगलेच अडचणीत सापडले होते. संपूर्ण देश त्यांच्याविरोधात उभे राहिला असताना हिंदुत्वासाठी बाळासाहेब ठाकरेंनी मोदींची पाठराखण केली. गुजरातमधील दंगलीचे निमित्त करून मोदींना राजधर्माची आठवण करून देणारे त्यांच्याच पक्षाचे लोक होते. तेव्हा ‘राजधर्म वगैरे ठेवा बाजूला, हिंदू धर्म म्हणून मोदींना हात लावू नका, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उठवू नका, असे ठणकावून बोलणारे देशात एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेले जे.पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत?’ असा खोचक सवालही शिवसेनेनं सामना अग्रलेखातून विचारला आहे.