महान गायक प्रफुल्ल कर यांचे निधन, पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली : आज महान गायक आणि लेखक प्रफुल्ल कर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८३ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हदयविकाराचा झटका आल्यानं त्यात त्यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगण्यात येत आहे. ओडिया म्युझिक इंडस्ट्रीतील मोठं नाव म्हणून त्यांना ओळखलं जात असे . त्यांच्या निधनावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी सोशल मीडियावर ट्विट करुन कर यांना आदरांजली वाहताना लिहिले आहे की,ओडिया संस्कृती आणि संगीतातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. ते अष्टपैलुत्वाने संपन्न होते. त्यांची सर्जनशीलता त्यांच्या कामातून दिसून आली. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना.’असे मोदींनी म्हटले आहे.
संगीताची जाण, त्यातून त्यांनी मांडलेला वेगळा विचार यातून त्यांचे व्यक्तिमत्व नेहमीच प्रेरणादायी राहिल. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे संगीतसृष्टीमध्ये आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या कार्यानं चाहत्यांची मोठी पसंती मिळवली होती.तर त्यांना 2004 मध्ये जयदेव पुरस्कार आणि 2015 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. प्रफुल्ल यांनी 70 पेक्षा अधिक उडिया तर 4 बांग्ला भाषेतील चित्रपटांसाठी संगीत दिले होते.