मणिपूरच्या पीडित महिलेचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “पोलिसांनीच आम्हाला…”

मणिपूर | Manipur Viral Video – मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची जमावाने नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजनक घटना 4 मे 2023 रोजी मणिपूरमधील थौबार जिल्ह्यात घडली आहे. तसंच दोन महिने उलटूनही आरोपींना अटक केलेली नाहीये. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरातनू तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या संतापजनक घटनेतील दोन पीडित महिलांपैकी एका महिलेनं इंडियन एक्स्प्रेसला प्रतिक्रिया देताना धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी पीडितेनं पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या ताब्यात दिल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे आता सगळीकडे खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
यावेळी 20 वर्षीय पीडितेनं सांगितलं की, ज्यावेळी जमाव त्यांच्या गावावर हल्ला करत होता त्यावेळी पोलिसही तिथे हजर होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तेथून सोबत घेतलं. काही अंतरावर गेल्यानंतर पोलिसांनी आम्हाला रस्त्यावर जमावासोबत सोडून दिलं आणि ते तिथून निघून गेले. पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या हवाली केलं. तसंच या जमावाने पीडित महिलेचा भाऊ आणि वडिल यांची हत्याही केली.