धक्कादायक! पी. जोग शाळा प्रशासनाचा भोंगळ कारभार

दहावी सीबीएसई निकाल परीक्षेविनाच; पालक आक्रमक
पुणे : नुकताच सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र या निकालानंतर पुण्यातील कोथरूडमधील पी. जोग शाळेत मात्र नाराजी व्यक्त करीत शाळेच्या विरोधात गोंधळ घालत पालकांकडून आंदोलन करण्यात आले. पालकांनी शाळेने दहावीचा निकाल खोटा लावल्याचा आरोप केला आहे. जोग शाळेने पहिल्या सेमिस्टरचे पेपर झाले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. केवळ सेमिस्टर परीक्षेवर निकाल लावला असल्याने अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यामुळे नापास मुलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. शाळेने केवळ सेमिस्टरवर दहावीचा निकाल लावला हे अत्यंत धक्कादायक आहे. अनेक विद्यार्थ्यांना शाळेने चक्क नापासच केले आहे. या चुकीच्या निकालामुळे आमची मुले घाबरलेली आहेत. त्यांना काय झालं तर याची जबाबदारी कोण घेणार, असा आक्रमक सूर पालकांमधून उमटला. सीबीएसईच्या पहिल्या सेमिस्टरचे पेपर न घेताच शाळेने निकाल जाहीर केल्याचा आरोप पालकांनी केल्याने शैक्षणिक संस्थांमध्ये नावाजलेली पी. जोग या नावाला गालबोट लागल्याचे दिसते.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खोटे मार्क देत रिझल्ट लावून ९० टक्के मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा केवळ ६० टक्के निकाल लावल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या सगळ्या संतप्त पालकांनी शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या आवारात आंदोलन सुरू केले आहे.
सीबीएसईच्या नियमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे दोन टर्ममध्ये होऊन दोन्ही टर्मचे मार्क हे बोर्डाला कळवावे लागतात. पण या शाळेने पहिल्या टर्मचा पेपरच घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असल्याचा आरोप पालकांनी केला. विशेष म्हणजे सीबीएसई बोर्ड हा इयत्ता पाचवीपासून द्यायचा असतो. या शाळेने या विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्ड नववीला दिला. त्यामुळेच प्रशासनाने भोंगळ कारभार केला असल्याचा आरोपही पालक आणि विद्यार्थ्यांनी केला. ‘आम्हाला पहिल्या सेमिस्टरचे हॉल तिकीटच आले नव्हते. आमची परीक्षा झाली नाही. पहिल्या सेमिस्टरचे कमी गुण मिळाल्याने आमचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याबद्दल शाळेसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून काहीही उत्तर मिळाले नसल्याचे धक्कादायक बाब एका विद्यार्थिनीने सांगितली.
शाळेविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा
पालकांच्या आरोपावर शाळा कोणत्याही प्रकारचे उत्तर देत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळेला सीबीएसई बोर्डाची मान्यता उशिरा मिळाली. पहिल्या सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना खूपच कमी गुण मिळाले, विद्यार्थ्यांचे निकाल धक्कादायक लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्यच अडचणीत सापडले आहे, असा संताप पालकांकडून व्यक्त करण्यात आला.