ताज्या बातम्यारणधुमाळी

“मी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर…” श्रीकांत शिंदेंचं ‘त्या’ व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण

मुंबई | Shrikant Shinde’s Explanation On Viral Photo – सध्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी कोणाला परवानगी मिळणार ? यासंदर्भात न्यायालयातील सुनावणीची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र याच दरम्यान, एका फोटोवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. मागे ‘महाराष्ट्र शासन..मुख्यमंत्री’ असा बोर्ड असताना पुढे खुर्चीवर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) बसल्याचं या फोटोमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे राज्याचा कारभार श्रीकांत शिंदे हाकतात का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी त्या फोटोसंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले, “आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) एक व्हीसी आहे. त्यासाठी ती व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठीच एखाद्या अधिकाऱ्यानं मागच्या बाजूला बोर्ड आणून ठेवला असेल. पण तो बोर्ड तिथे असेल, याची मला कल्पनाही नव्हती. हे आमचं घर आहे. या घरातून समस्या सोडवण्याचं काम वर्षानुवर्ष होतंय. ही व्यवस्था तात्पुरती करण्यात आली होती”.

“बाहेर मुख्यमंत्र्यांचा बोर्ड लावला आहे. तिथे जर मी बाजूला जाऊन उभा राहिलो, तर त्यातूनही कदाचित वेगळा अर्थ काढला जाईल. यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही”, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “हे सगळं हास्यास्पद आहे. हा फोटो सगळीकडे शेअक केला जात आहे. ज्या कार्यालयातला फोटो व्हायरल होत आहे, ते आमचं ठाण्यातल्या घरातल्या कार्यालयातला फोटो आहे. ती माझीच खुर्ची आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासूनच लोक आम्हाला इथेच भेटायला येतात. मी किंवा एकनाथ शिंदे, आम्ही दोघं या ऑफिसचा वापर करतो. हे घर शासकीय घर नाही. मी वर्षा बंगल्यावर किंवा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो असं नाही. पण यातून बदनाम करण्याचं काम केलं जात आहे”.

“झालेला प्रकार अनावधानाने झाला असेल. या गोष्टी अनावधानाने झाल्या असतील. पण या गोष्टी फुगवून ते शासकीय निवासस्थान, मुख्यमंत्र्यांची खुर्ची असल्याचं सांगितलं. मी दोन टर्म खासदार आहे. मला माहिती आहे की कुठे बसायचं आणि कुठे नाही बसायचं”, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये