शिवपुतळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून सोळा कोटींचा निधी

सातारा : मराठा साम्राज्याची राजधानी असणार्या ऐतिहासिक सातारानगरीमध्ये पोवई नाक्यावर नूतन पूर्णाकृती शिवपुतळा बसवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे, याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे नगरपालिकेने दिलेल्या या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेऊन तसा निधी नगरपालिकेला वितरित केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्याच्या विविध विकासकामांच्यासंदर्भात एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौर्यावर आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी दिल्ली दौर्यात त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सातारा शहरातील विविध विकासकामांच्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याकरिता आणि इतर सुविधांसाठी सोळा कोटी १४ लाख रुपयांचा प्रस्ताव सातारा नगरपालिकेने राज्य शासनाला सादर केला होता व याकरिता राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती करण्यात आली होती. शिवप्रभूंच्या पूर्णाकृती स्मारकाच्या प्रेरणादायी कार्यासाठी आम्ही निधी देत आहोत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेचा नितांत आदर करतो.
या प्रस्तावाला मी तत्त्वतः मंजुरी देत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ जाहीर केले. पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासह परिसराचे पूर्णतः विकसन आणि आकर्षक ऐतिहासिक बाज असणार्या भव्य चित्रकृती यांचा या कामांमध्ये समावेश असणार आहे. या विकास प्रकल्पाचा सातारकरांना निश्चित अभिमान वाटेल आणि या विकासकामाची लवकरच सुरुवात होईल, असा ठाम विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी दर्शविला.