‘…म्हणून मी आणि नवनीत राणा मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू’- रवी राणा
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता या विषयावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापताना दिसत आहे. सोबतच, मशिदींवरल भोंगे जर काढले नाहीत तर मशिदींसमोर सामूहिक हनुमान चालीसा पठण केले जाईल, असा इशाराही दिला गेला आहे. या पार्श्वभूमीवरच हनुमान जयंतीनिमित्त आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच खोचक शब्दांत इशारा दिला आहे.
यावेळी, रवी राणा यांनी म्हटलं आहे की, “हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर मी आणि खासदार नवनीत राणा हनुमान चालीसा वाचणार आहोत. हनुमान मंदिरावर भोंगा लावणार, ज्या मंदिरांवर हनुमान चालीसा वाचताना भोंगा नाही. त्या मंदिरांना भोंग्याचं वाटप देखील करणार आणि राम मंदिरात सुंदरकांड झालं पाहिजे यासाठी देखील भोंग्याचं वाटप आम्ही करणार आहोत.”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हनुमान जयंतीननिमित्त मातोश्री येथे हनुमान चालीसा वाचली पाहिजे. बाळासाहेबांचे विचार जागृत केले पाहिजे, जर त्या ठिकाणी हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचत नसतील, तर मला असं वाटत आहे की त्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यांना जागृत करण्यासाठी हनुमान जयंतीनंतर मी आणि खासदार नवनीत राणा मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू आणि बाळासाहेबांच्या विचाराचा त्यांना जो विसर पडला आहे, याची त्यांना जाणीव करून देऊ. अशाप्रकारे आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचून त्यातून एका चांगला संदेश देणार आहोत.” असं देखील आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.