फिचरमाय जर्नीराष्ट्रसंचार कनेक्ट

समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा : चिन्मय खोटे

जे नको होतं, पण आपल्याला पाहायला लागलंय, ते किमान दुसर्‍यांना तरी पाहायची वेळ यायला नको म्हणून आपलं काही योगदान असावं ही एकच मनीषा ठेवून चिन्मय खोटे या तरुणाने गरीब रुग्णांच्या सोयीसाठी अ‍ॅम्ब्युलन्स सुरू केली.
पुण्यातील शेवाळेवाडी भागात राहणारा चिन्मय खोटे मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे. २०२० मध्ये त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. कोरोना काळात आपण सर्वांनी खूप वाईट परिस्थितीचा सामना केला आहे. कित्येकांना वेळेत उपचार नाही मिळाल्याने आपले जीव गमवावे लागले. आपल्यातल्या अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना या काळात गमावलं. चिन्मयही त्यापैकीच एक. कोरोना काळात त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. वेळेत उपचार न मिळाल्याने चिन्मयला त्याच्या आईला गमवावं लागलं. त्यामुळं खूप मोठ्या दुःखाला त्याच्या कुटुंबाला सामोरं जायला लागलं.


तेव्हाच चिन्मयनं ठरवलं आपल्याला जे पाहावं लागलंय ते इतरांना नको; त्यासाठी आपण काहीतरी करायचं आणि स्वतःच ‘चंद्राई अ‍ॅम्ब्युलन्स’ रजिस्टर करून हडपसर भागात रुग्णांच्या सोयीसाठी सुरू केली. गेल्या दीड वर्षापासून गरीब रुग्णांना चंद्राईनं मदत केली आहे. रुग्णांसाठी रात्री अपरात्री चोवीस तास सेवा चिन्मय पुरवतो. अनेकवेळा रुग्णांची परिस्थिती बघून चिन्मय मोठ्या मनानं त्यांना समजून घेतो आणि कमी खर्चात त्यांची मदत करतो.


मला त्या परिस्थितीची जाणीव आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खूप आजारी असते, त्यावेळी त्या व्यक्तीला सगळ्यात अगोदर रुग्णालयात घेऊन जाणं महत्त्वाचं असतं आणि ते मी करतो. त्यामुळं मी कोणाच्यातरी कामी आलो याचं मला समाधान वाटतं, असं चिन्मय सांगतो. अ‍ॅम्ब्युलन्स सोडून चिन्मयच्या घरी किराणा दुकान आहे. पिठाची गिरणी आहे. गावाकडे ‘चंद्राई हेल्थ केअर’ म्हणून जिम आहे. हे सगळं चिन्मयचा मोठा भाऊ, वडील आणि वहिनी बघतात. अ‍ॅम्ब्युलन्समधून वेळ मिळेल तेव्हा इतर कामांमध्ये लक्ष देत असतो. अ‍ॅम्ब्युलन्सची संख्या वाढवून जास्तीत जास्त लोकांना सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचं चिन्मयचं स्वप्न आहे. भविष्यात गरजू लोकांची सेवा करता यावी एवढीच इच्छा असल्याचं चिन्मय सांगतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये