
स्त्री जीवनाची कहाणी वेगळी असते असे म्हटले जाते, ते काही खोटे नाही. लहानाची मोठी होणारी ही नाजूक कळी आधी आई-वडिलांच्या सुरक्षितेच्या छायेत राहते, त्यानंतर पंखात बळ आले, की शिक्षणासाठी बाहेर पडते आणि संसारात आपल्याला मुला-बाळांच्या शिक्षणात त्यांना वाढवण्यात स्वतःला वाहून देते. अशी ही कुटुंबाचा दोन्ही घरांचा आधार असणारी ही स्त्री मात्र स्वतःचे आयुष्य जगायला विसरून जाते. परंतु अशादेखील स्त्रिया आहेत ज्या आपला संसार सांभाळत स्वतःच्या स्वप्नांना कवेत घेत प्रगतिपथावर काम करीत आहेत. अशाच सौ. हेमलता कुऱ्हाडे या आहेत. पेशाने त्या शिक्षिका असून त्यांचा जन्म तळेगाव ढमढेरे कुटुंबात झाला. त्यांचे वडील मुख्याध्यापक होते व बहीण त्याकाळची शिक्षिका त्यामुळे त्यांना शिक्षकी पेशा आवडत असे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा व पाचवीनंतर सुभाष विद्यामंदिर तळेगाव ढमढेरे येथे झाले.
१९८४ मध्ये त्यांची दहावी झाली. लगेचच डीएडला नंबर लागला. त्यावेळी दोन वर्षांचे डीएड असायचे. त्यानंतर त्यांनी दीड वर्ष नोकरी केल्यानंतर लग्न झाले. देवाची आळंदी या ठिकाणी राहणाऱ्या कृष्णाजी मास्तर ह्यांचे पुत्र म्हणजे पंडित अण्णा कुऱ्हाडे हे त्यांचे सासरे. सर्व शिक्षकच होते. तसेच सासरे सामाजिक कार्यात असल्यामुळे लग्नानंतर त्यांच्यातील सामाजिक जाणिवा हेमलता यांना जवळून बघता आल्या. राजकीय, शैक्षणिक वारसा मिळालेले हे घर आणि त्यातील माणसे त्यांनी हेमलता यांना पुढे नोकरीसाठी कायम पाठिंबा दिला. गेली ३६ वर्षे त्या शिक्षिका म्हणून काम करीत आहेत. दररोज २७ ते २८ किलोमीटरचा प्रवास करून अनेक मुलांना शिकवण्यासाठी जातात. तेवढेच नव्हे, तर एकत्र कुटुंब, घरातील कामे आवरून लहान बाळाला घरी ठेवून जावे लागे. सामाजिक कार्यदेखील त्या करतात. गोरगरीब मुलांना शालेय फीची मदत करणे, पुस्तके घेऊन देणे, मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्या झटत असतात.
हेमलता कुऱ्हाडे सांगतात की, शिकवणे आणि मुलांना प्रेम, ज्ञानाचे धडे देणे त्यातून मलाही अनेक गोष्टी शिकता येतात. निरागस छोटी मुले आपल्यावर आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम करतात, तसेच जे विद्यार्थी आपल्या हाताखालून घडून गेलेत कोणी डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस, नर्स अशा प्रकारे ते भेटायला आले, की फार छान वाटते आणि खरोखर आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे वाटते. गेली तीन वर्षे मी मुख्याध्यापकपदावर कार्यरत आहे. पद सांभाळतानासुद्धा सर्व शिक्षक-पालकवर्ग यांना येणाऱ्या अडचणी सोडविताना, तसेच समजून घेऊन समतोल राखूनच काम केले पाहिजे, हा विचार सतत मनात असतो. यामुळे हे क्षेत्र रोज मला काहीतरी शिकवत असते, असे मी म्हणेन.