हिंदुत्ववाद्यांचे नव्हे, तर माफियांचे राज्य; डॉ. कुमार सप्तर्षी यांची स्पष्टोक्ती

पुणे ः ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले लिखित ‘हू किल्ड जज लोया?’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, राज्याचे माजी विशेष पोलिस महासंचालक एस. एम. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. मध्यमवर्गाने प्रचारकी गोष्टींना विरोध केला नाही तर आपला लोचा तरी होईल किंवा लोया तरी होईल. आपल्यावर हिंदुत्ववादी राज्य करीत नसून माफिया राज्य करीत आहेत. या काळात आपण वेडे होण्याच्या कडेलोटावर उभे आहोत. त्यातून सत्याकडे जाण्याची इच्छा निरंजन टकले यांच्या पुस्तकाचे वाचन केल्यावर निर्माण होते, असे मत डॉ. सप्तर्षी यांनी मांडले आणि या प्रकरणाला पुन्हा नव्याने चर्चा मिळाली.
आताची आणीबाणी फार वेगळी आहे. या आणीबाणीत माफियागिरी आहे. हिंदुत्ववादी सत्याच्या बाजूने असू शकत नाहीत, हे या पुस्तकातून लक्षात होते. या देशात माणसं मारण्याचा पद्धतशीर उद्योग चालू आहे. सत्य बोलणार्यालाच जिवाला जपावं लागत असेल, तर समाजात मोठा बिघाड झाला आहे. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या काळात अमित शाह नागपूरच्या रवी भवनला असणं, मुख्य न्यायाधीश असणं, यातून सर्व गोष्टींचा उलगडा होतो.
_डॉ. कुमार सप्तर्षी, अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी.
निरंजन टकले म्हणाले, ‘फॅसिस्ट प्रवृत्तींना आपण घाबरत नाही, हे दाखवावं लागतं. प्रत्येक क्षणी अडथळे येणार हे लक्षात ठेवावे लागते. मगच शोधपत्रिका करता येते. न्या. ब्रिजगोपाल लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणावर बातमी करण्यासाठी माहिती मिळविताना खूप धमक्या आल्या, भीती दाखवली गेली. लोया यांच्यावर एका खटल्यासंदर्भात दबाव असल्याची कल्पना त्यांच्या भगिनीला दिली होती.
सर्वोच्च न्यायालयात अनपेक्षित घडामोडी घडल्या. जर हृदयविकाराने लोयांना मृत्यू आला होता तर कपडे रक्ताने का माखले होते? लोयांना आर्थोपेडिक हॉस्पिटलला का नेण्यात आले? मृत्यूची जी वेळ दाखवली गेली, त्याआधीच नातेवाइकांना मृत्यूची बातमी का कळवली? मृतदेह लातूरला का नेला गेला? जे न्यायाधीश लोयांच्या सोबत मुंबई ते नागपूर प्रवासात होते, ते मृत्यूनंतर लोयांच्या नातेवाइकांना लगेच सांत्वनासाठी का भेटले नाहीत? असे अनेक गूढ प्रश्न न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूमागे आहेत.
हे पुस्तक प्रकाशित करताना अनेक प्रकाशकांनी नकार दिला. आयएसबीएन नंबरसाठी अडचणी आल्या. तरीही हे पुस्तक प्रकाशित झाले. पुढे मराठी, गुजराथी, पंजाबी, कन्नडमध्ये अनुवाद येणार आहे. २०१४ नंतरच्या काळात पत्रकारांनी सत्य सांगून सैतानी वृत्तीला लाजवलं पाहिजे. आता केवळ लिहून चालणार नाही, तर बोलत राहिले पाहिजे.
एस.एम. मुश्रीफ, गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ. मच्छिंद्र गोरडे, युक्रांदचे संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, आप्पा अनारसे व्यासपीठावर उपस्थित होते. सभागृहात अन्वर राजन, डॉ. प्रवीण सप्तर्षी, सुनीती सु. र., गोपाळ तिवारी, प्रशांत कोठडिया, विकास लवांडे, प्रसाद झावरे, श्रीरंजन आवटे, संदीप बर्वे उपस्थित होते.