ताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळ आला होता पण वेळ नाही! एसटी ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक, प्रवाशानं स्टिअरिंग हातात घेतलं अन्…

सोलापूर | Solapur Pune Highway Bus Accident – काळ आला होता पण वेळ नाही, या म्हणीचा प्रत्यय उदगीर-पुणे बसमधील प्रवाशांना आला आहे. सोलापूर पुणे महामार्गावरून धावत असलेल्या एका बसचा मोठा अपघात (Bus Accident) होणार होता. मात्र, एका तरूणाच्या प्रसंगावधानामुळे 40 प्रवाशांचा जीव वाचला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील सुधीर रणे या प्रवाशानं प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

उदगीरवरून पुण्याकडे निघालेल्या बसमध्ये साधारण 40 प्रवासी प्रवास करत होते. इंदापूर ओलांडून एसटी बस सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून पळसदेव गावाच्या हद्दीत आली होती. त्यावेळी अचानक रात्री अकरा वाजताच्या सुमारास बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना हार्ट अटॅक आला. त्यामुळे बस चालू असतानाच ते स्टिअरिंगवर कोसळले. तसंच चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी गार्डला धडकली. त्यानंतर सर्व प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण त्याचवेळी प्रसंगावधान राखत सुधीर रणे या प्रवाशानं स्टिअरिंगचा ताबा घेतला अन् मोठा अपघात टळला. त्यानं तब्बल 40 प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

प्रवाशी सुधीर रणे यांनी वेळीच बस नियंत्रणात आणली, अन्यथा बस महामार्गाच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर जाऊन किंवा उजनी जलाशयाच्या बॅकवॉटरमधील पाण्यात जाऊन पलटी झाली असती. त्यानंतर सुधीर रणे व वाहक संतोष गायकवाड यांनी बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना बोनेटवर झोपवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच चालक गोविंद सूर्यवंशी शुद्धीवर आले. मात्र, चालक पुन्हा बेशुद्ध झाल्यानं सुधिर रणे यांनी अँब्युलन्सची वाट न पाहता बस घेऊन भिगवण येथील यशोधरा हॉस्पिटल गाठलं. सूर्यवंशी यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होऊ शकले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये