शेतकऱ्यांना भुर्दंड, सोयाबीनचे दर घसरले

अकोला : अनेक अल्पभूधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यावर्षी दिवाळीही अंधारात गेली आहे. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणले. उत्पन्न वाढल्याने आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ओलाव्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून कमी भावाने सोयाबीन खरेदी करण्यात आले. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख ८३ हजार ५०० हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले होते. त्यामधील अतिरिक्त दोन लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरण्यात आले. बहुतांश शेतकरी आता सोयाबीनकडे झुकले आहेत. यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच दमदार पाऊस झाला. अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊन शेतीत पाणी साचले. त्यातच परतीचा पाऊस देखील कोसळला. परिणामी, पिकांवर दुष्परिणाम झाला. नैसर्गिक संकटांशी तोंड देताना शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उत्पादन घेतले. काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळाली, तसेच, असंख्य शेतकऱ्यांना अद्यापही त्याची प्रतीक्षा आहे.
विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मग दिवाळीसारख्या मोठ्या सणाचा खर्च कसा भागवायचा? या गोंधळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन काढून बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणले, मात्र तेथेही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन काढले जाते. दिवाळीदेखील ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आल्याने सोयाबीन काढून ते विक्री करण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. दिवाळीच्या तोंडावर बाजारात सोयाबीनची प्रचंड आवक वाढल्याचे दिसले.