“मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही…”, तरूण डाॅक्टरची आत्महत्या
कोल्हापूर | Kolhapur Crime – गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात आत्महत्यांचं (Kolhapur Crime) सत्र सुरूच आहे. आताही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये एका तरूण डाॅक्टरनं आत्महत्या केली आहे. डॉक्टरनंच आत्महत्या केल्यानं मुरगूड शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी (12 मार्च) उघडकीस आला.
मुरगूड येथील डॉक्टर महेश रामचंद्र तेलवेकर (वय 40 वर्षे) यांनी आपल्याच दवाखान्यात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉक्टर तेलवेकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहीली होती. ती चिठ्ठी सापडली असून यामध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये, असा उल्लेख केला आहे. “मी एक चांगला मुलगा, चांगला बाप होऊ शकलो नाही. मी कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही. तसंच मी काही कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत. तर माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये,” असा मजकूर त्यांनी लिहिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे नाणीबाई चिखली (ता. कागल) येथील डॉक्टर महेश तेलवेकर आपल्या कुटुंबीयांसह मुरगूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून राहत आहेत. आधी त्यांचा कागलमध्ये दवाखाना होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी मुरगुडमध्ये ‘ओम क्लिनिक’ नावानं दवाखाना सुरु केला होता. रविवारी दुपारच्या सुमारास त्यांनी याच दवाखान्याच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर नायलॉनच्या दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती शिवाजी कुंभार यांनी मुरगूड पोलिसात दिली.