देश - विदेश

समुद्रकिनारी वाहून आला सोन्याप्रमाणे चमकणारा ’रहस्यमयी रथ’

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली येथे समुद्रकिनार्‍याजवळील लोकांना मंगळवारी संध्याकाळी अचानक ‘सोन्याचा रथ’ दिसला. सोन्यासारखा दिसणारा हा रथ समुद्रातून किनार्‍याकडे सरकत होता. लोकांनी हा गूढ रथ पाहताच त्याला दोरीने बांधून किनार्‍यावर ओढून आणले. सुन्नापल्ली बीचवर उपस्थित स्थानिक लोकांनी रथाला दोरीच्या साहाय्याने बांधून किनार्‍यावर आणले. हा रथ अगदी सोन्याचा दिसत होता. मात्र, तो समुद्रात वाहून कुठून आला, हे कोणालाच कळू शकलेले नाही. आग्नेय आशियाई देशांतील एखाद्या मठातून हा रथ वाहून आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चक्रीवादळामुळे हा रथ समुद्रात वाहून येत सुन्नापल्ली किनार्‍याजवळ पोहोचला असण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. स्थानिकांच्या मते, रथावर विदेशी भाषेत काहीतरी लिहिले आहे आणि ती मलेशियन, थायलंड किंवा जपानी भाषा असू शकते.

हा रथ दुसर्‍या देशातून आला असावा, असे श्रीकाकुलम पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत वरिष्ठांना कळवले असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक बोटवाल्यांनी लावलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळाच्या जोरामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या लाटांसोबत हा रथ किनार्‍यावर पोहोचला असावा. यानंतर स्थानिक लोकांनी तो पाहिला आणि दोरीने बांधून किनार्‍यावर आणला. या सोन्याच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने किनार्‍यावर पोहोचत असून हा रथ लोकांसाठी कुतूहलाचा
विषय ठरत आहे.

संतबोममाळीचे तहसीलदार जे चलमय्या यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, हा रथ इतर कोणत्या देशातून आलेला नसेल. तो भारतातीलच एखाद्या किनार्‍यावर चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापरला गेला असेल आणि लाटांसोबत वाहून आला असेल.’
रथ मंदिराच्या आकाराचा असून अतिशय भव्य आणि सोन्यासारखा दिसत आहे. समुद्रातून रथ बाहेर आल्याचे वृत्त परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये धार्मिक भावनेची लाट उसळली असून गूढ रथाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो नागरिक पोहोचत आहेत. त्याची वास्तुकला प्राचीन वास्तूंसारखी आहे. मात्र, या रहस्यमयी रथाबाबत अद्याप खात्रीपूर्वक काहीही सांगण्यात आलेले नाही. पण, दर्शन घेऊन परतणारे त्याचे जोरदार वर्णन करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये