‘अजितदादा पुण्याचे पालकमंत्री व्हावेत’

पुणे | Ajit Pawar – दोन दादांचे सध्या पालकमंत्रिपदावरुन कोल्ड वॉर सुरु असल्याचे दिसून आले. पुण्याचे (Pune) पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) असताना अजित पवारांचे (Ajit Pawar) कार्यकर्ते दादा पुण्याचे पालकमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त करत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचा पुण्यात पहिल्यांदाच जाहीर सत्कार आणि रोड शो पार पडला. यानिमित्त कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.
अजित पवार यांना पुण्याची सर्व माहिती आहे आणि म्हणूनच ते पालकमंत्री व्हावेत, अशी इच्छा अजित पवार समर्थकांनी व्यक्त केली. कोल्हापूर दौऱ्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवारी पुण्यात भव्य रोड शो पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्यासोबत दिसली.
अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी सत्कार केला. कुठे जेसीबीतून फुलांचा वर्षाव, तर कुठे हार, तुरे, शाल देऊन कार्यकर्ते दादांचा सत्कार करताना दिसले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रोड शोला सुरुवात झाली. त्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीची पूजाही करण्यात आली.