सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाल्या, “ज्या दिवशी त्यांच्या समोरून माईक काढून…”

मुंबई | Supriya Sule On CM Eknath Shinde – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. गुरूवारी सायंकाळी मुंबईमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसमोरील माईक खेचल्याच्या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना शाब्दिक चिमटा काढला. यावेळेस सुप्रिया सुळेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला आहे.
सुप्रिया यांनी घाटकोपरमधील एका कार्यक्रमाला गुरूवारी (14 जुलै) हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुपर सीएम झाले आहेत का यासंदर्भातील प्रतिक्रिया विचारण्यात आली. याच प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया यांनी माईक खेचल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली.
“आत्ताचे सगळे निर्णय पाहिले तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारुन सगळे निर्णय घेतायत. सुपर सीएम झालेत का ते?” असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया यांना विचारला. यावर त्या म्हणाल्या, “हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारु शकता. ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून घेतला त्यादिवशीच ते लक्षात आलं होतं,” असं उत्तर सुप्रिया यांनी हसत हसत दिलं. पुढे बोलताना, “त्यांना (शिंदे यांना) चालत असेल ते” असं म्हणत सुप्रिया यांनी शिंदेंना फडणवीसांच्या सल्ल्याने काम करणं योग्य वाटत असेल अशा अर्थाचं वक्तव्य केलं आहे.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला हे कौतुक वाटतं कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे शिवसैनिक खूप स्वाभिमानी होते. त्यांच्यात काय नवीन बदल झालाय मला काही समजेना.”