अर्थ

भारतात बंदी, जगात टिकटॉकची चांदी; महसुलातल्या वाढीमुळे मेटा चिंतेत

भारतात बंदी घालण्यात आलेलं टिकटॉक ऍप जगभरात धुमाकूळ घालत आहे. एकीकडे फेसबुक, ट्विटरसारख्या लोकप्रिय समाजमाध्यमांच्या महसुलात घट नोंदवली जात असताना दुसरीकडे टिकटॉक कमाईचे नवे विक्रम नोंदवताना दिसत आहे. टिकटॉकने जागतिक पातळीवर जाहिराती मिळवण्याच्या बाबतीत फेसबुक, ट्विटर आणि स्नॅपचॅटलाही मागे टाकलं आहे. द गार्डियनच्या अहवालानुसार टिकटॉक २०२४ पर्यंत जाहिरातींमधून मिळणार्‍या महसुलाच्या बाबतीत यू ट्यूबलाही मागे टाकू शकतं.

यू ट्यूब जाहिरातींच्या माध्यमातून २३.६ अब्ज डॉलर्स एवढा महसूल मिळवतं. येत्या काळात टिकटॉक एवढी कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. भारताने टिकटॉकवर बंदी घातली असली तरी हे अ‍ॅप मोठ्या प्रमाणावर कमाई करताना दिसत आहे. एकेकाळी चीननंतर भारत ही टिकटॉकची दुसर्‍या क्रमांकाची बाजारपेठ होती.

मात्र भारतात बंदी असूनही टिकटॉक जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. एक वापरकर्ता दर महिन्याला सरासरी १९.६ तास टिकटॉकवर घालवत असल्याची बाब एका अहवालातून समोर आली आहे. टिकटॉकच्या लोकप्रियतेमुळे फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपची मालकी असणार्‍या मेटा या कंपनीला चिंतेत टाकलं आहे. आजघडीला फेसबुकचे २.९ अब्ज वापरकर्ते आहेत, तर इन्स्टाग्राम वापरकर्त्यांची संख्या दोन अब्ज इतकी आहे.

मेटाने गेल्यावर्षी ११८ अब्ज डॉलर्स एवढा महसूल मिळवला होता. मात्र येत्या काळात टिकटॉक मेटाला मागे टाकू शकतं. अमेरिकेत टिकटॉक वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली जात असून, नॉन गेमिंग अ‍ॅप्सच्या लोकप्रियतेच्या यादीत टिकटॉकने दुसरं, तर इन्स्टाग्रामने तिसरं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे येत्या काळात टिकटॉक मोठी भरारी घेणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये