रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “माझं बोलणं झालंय…”
पुणे | Supriya Sule’s Reaction To Rohit Pawar’s ED Inquiry – सध्या राज्यात विरोधकांवर ईडी, सीबीआयच्या कारवायांचा धडाका सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. तसंच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीने निशाणा साधला आहे. याच संदर्भात रोहित पवारांच्या आत्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातल्या कोथरूडमध्ये महागाईविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सुप्रिया सुळे सहभागी झाल्या आहेत. त्यावेळी त्यांना रोहित पवारांच्या ईडी चौकशीसंदर्भात विचारणा केली असता त्या म्हणाल्या, रोहित पवार यांची कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. अशा बातम्या फक्त माध्यमांमध्ये चालत आहेत. प्राथमिक चौकशी झाल्याच्या बातम्याही येत आहेत. पण माझं रोहितशी बोलणं झालंय, त्यांना अजून नोटीस आलेली नाही.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्यापैकी कोणालाही नोटीस आली तर आमची नेहमी सहकार्याची भूमिका राहिलेली आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला काही लपवायची गरज नाही. अशी काही चौकशी झाली तर आम्ही उत्तर देऊ.