ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

“सुशांतची आत्महत्या नाही…”, शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याचा खळबळजनक दावा

मुंबई | Sushant Singh Rajput – अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सुशांतच्या शवविच्छेदनावेळी हजर असलेल्या एका व्यक्तीनं खळबळजनक दावा केला आहे. सुशांतची आत्महत्या नसून त्याचा खून करण्यात आला होता, असं या व्यक्तीनं म्हटलं आहे. त्यानं केलेल्या या दाव्यानंतर सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे.

कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांत सिंह राजपूतचे पोस्टमॉर्टम करणारे रूपकुमार शाह यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. “सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला होता तेव्हा आमच्याकडे 5 ते 6 मृतदेह शवविच्छेदनासाठी आले होते. त्यामध्ये एक आत्महत्या केलेला व्हीआयपी मृतदेह होता. जेव्हा तो मृतहेद शवविच्छेदन करण्यासाठी टेबलवर घेतला तेव्हा तो सुशांतचा असल्याचं कळलं. सुशांतच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आणि गळ्यावर दोन व्रण होते. तसंच हातापायावर मार लागून तुटल्यासारख्या खुणा होत्या. त्यामुळे त्याची व्हिडीओ शूटींग करायला हवी होती असं आमचं म्हणणं होतं. मात्र, अधिकाऱ्यांनी फक्त फोटो काढायला सांगितलं. आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितलं की, ही हत्याच वाटत आहे. त्यापद्धतीनं त्यावर काम करावं, पण वरिष्ठ म्हणाले तत्काळ शवविच्छेदन करुन मृतदेह द्यायचा आहे”, असं शाह यांनी सांगितलं.

पुढे त्यांनी सांगितलं की, “खून झालेल्या आणि गळफास घेतलेल्या मृतदेहात खूप फरक असतो. सुशांतच्या गळ्यावरती असलेले व्रण हत्या केल्यासारखे दिसत होते. तसंच अंगावर मारहाणीचे व्रणही दिसत होते. असे व्रण आत्महत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या अंगावर नसतात,” अशी माहिती शाह यांनी टीव्ही 9 शी बोलताना दिली.

दरम्यान, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला होता. यानंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस, सीबीआय, ईडी आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी केली होती. या चौकशीमध्ये सुशांतची हत्या नसून आत्महत्या होती, असा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, आता रुपकुमार शाह यांच्या दाव्यानं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये