…स्वच्छतागृह की, तळीरामांचा अड्डा

पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे स्वच्छतागृहालाच खिंडार
येरवडा : विमाननगर भागातील यमुनानगर परिसरात पालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य वाढल्याने या भागातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे अधिकाऱ्यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असुंन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे स्वच्छतागृहाला खिंडार पडले असल्याचे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली असून याची त्वरित साफसफाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानचे वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष सचिन चंदनशिवे यांनी दिला आहे.
अनेकदा क्षेत्रीय कार्यालय अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रार करून देखील अधिकाऱ्यांनी जनतेच्या मुख्य समस्येकडे पाठ फिरविल्याने अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन छेडले.
सचिन चंदनशिवे विभाग अध्यक्ष, प्रधानमंत्री जन कल्याणकारी प्रचार प्रसार अभियान
उच्चभ्रू सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमाननगर भागातील यमुनानगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून कामानिमित्त नागरिक स्थायिक झाले असून असणारा परिसर बहुतांश प्रमाणात झोपडपट्टीचा भाग असल्याने पालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. मात्र तेथील झालेली दुरवस्था पाहून कोणत्याही नागरिकास स्वच्छतागृहात जाण्याची इच्छा होत नाही.
कारण स्वच्छतागृहासमोरच मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकल्याने पावसाळ्या दरम्यान येथून जातांना नागरिकांना कसरत करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. तर यासमोरच सांडपाणी देखील मोठ्या प्रमाणात साचल्याने परिसरात डासांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे या भागात चिकुन गुनिया,डेंग्यू यासारखे महाभयंकर आजार पसरतात की,काय?अशी भीती नागरिकांच्या मनामध्ये लागून राहिली आहे.
विशेष म्हणजे पालिकेच्या वतीने स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून ही देखील एक ही कर्मचारी या भागाकडे फिरकत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. हाकेच्या अंतरावारच नगररोड क्षेत्रीय कार्यालय असतांना देखील कर्मचारी फिरकत नसल्याने नागरिकांमध्ये याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच मोकाट जनावरांचा वावर देखील परिसरात दिवसेंदिवस वाढत असल्याने पालिकेच्या वतीने अशा मोकाट जनावरांचा कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त करण्यात न आल्याने एखाद्या दिवशी काही दुर्घटना घडली तर यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल सचिन चंदनशिवे यांनी केला आहे.
कोणी अधिकारीच याकडे लक्ष देत नसल्याने पालिका अधिकारी असून अडचण नसून खोळंबा ही परिस्थिती परिसरात पाहायला मिळत असून जनतेचे मुख्य प्रश्न मार्गी लागत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा काय? अधिकार आहे का, असा सवालही चंदनशिवे यांनी केला आहे. स्वच्छतागृहाला कोणी वालीच नसल्याने अनेकांचे असणारे साहित्य हे परिसरात अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.
विशेष करून शहरासह उपनगर भागातील असणाऱ्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणात वाट लागली असताना देखील कोणीच अधिकारी संबंधित घटनेची दखल घेत नसल्याने नागरिकांमध्ये विशेष करून महिलांमध्ये संतापाची लाट पसरली असून ज्येष्ठ नागरिकास तर या ठिकाणी जाणे देखील अवघड होऊन बसले आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छ पुणे उपक्रम राबविण्यात येत असतांना दुसरीकडे स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे.