राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढला

साथीच्या आजारांबरोबरच यंदा संसर्गजन्य असलेल्या स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नाशिकमध्ये १९, नागपूरमध्ये २६ अशा सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या दहा महिन्यांत स्वाईन फ्लूच्या ५६ मृत्यूंची नोंद झाली आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात २६ मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून गेल्या दहा महिन्यांत ५६ जणांचा मृत्यू, तर २२७८ जणांना लागण झाली आहे. जून महिन्यापर्यंत रुग्णसंख्या आटोक्यात होती. जून महिन्यापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४३२ जणांना लागण झाली आहे. पावसाळ्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होऊन ही रुग्णसंख्या तिप्पट झाली. स्वाईन फ्लूसंबंधी अधिक सर्तकता महत्त्वाची आहे. २८ ऑगस्टपर्यंत १४४२ रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून ३० जणांचा मृत्यू झाला होता. तसेच गेल्या दोन महिन्यांत ८३६ रुग्ण आणि २६ मृत्यूची नोंद झाली आहे. स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण म्हणजेच ७५६ रुग्ण मुंबईत आहेत. पुण्यामध्ये ३६० रुग्ण, तर ठाण्यात २७४ तर कोल्हापूरमध्ये २४९ रुग्ण असून एकही मृत्यू झालेला नाही. नाशिकमध्ये २७० रुग्ण असून १९ मृत्यू झाले आहेत. नागपूरमध्ये रुग्ण ११५ असून २६ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशात पावसाळ्यानंतर स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढताना दिसत होते. यामध्ये झारखंड, दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, मिझोराम या राज्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत स्वाईन फ्लूचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. बहुतेक लोक कोविड चाचणी घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचत आहेत. स्वाईन फ्लू आणि कोविडची लक्षणे सारखीच असल्याने लोकांमध्ये याबाबत संभ्रम वाढत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष
स्वाईन फ्लू रुग्णांसाठी वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष ठेवण्यात आला आहे. तसेच फ्लूसदृश्य रुग्णांचे वर्गीकरण करून विनाविलंब उपचार करण्यात येणार तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यातील गरोदर महिला, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आरोग्य कर्मचाऱ्यां फ्लू प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
स्वाईन फ्लूची लक्षणे
ताप, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थकवा