‘आई कुठे काय करते’ मालिकेला नवा ट्विस्ट; अनुष्काच्या एन्ट्रीने अरुंधती-आशुतोषच्या नात्यात दरी?

मुंबई : (Aai Kuthe Kay Karte Serial Star Pravah) आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत येणाऱ्या नव्या ट्विस्ट आणि वेगळ्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. अनेकदा टीआरपीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर असते. आता या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. नव्या पात्राच्या एन्ट्रीमुळे अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात नवं वळण येणार आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आशुतोषच्या वाढदिवशी अरुंधती आशुतोषच्या बाबतीतला सर्वात मोठा निर्णय घेणार होती. मात्र अनुष्काच्या एण्ट्रीने अरुंधतीला तिच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागणार आहे. अनुष्का म्हणजेच आशुतोषची खूप जुनी मैत्रीण. बऱ्याच वर्षांनंतर या दोघांची पुन्हा भेट होणार आहे.
या मालिकेत अभिनेत्री स्वरांगी मराठे अनुष्काच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेत खूपच भावनिक गुंतागुंत पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका सहाव्या स्थानावर होती. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले होते.