परकीय आक्रमणे सुलतानांपुरती मर्यादित नाही

इतिहास अभ्यासक जयकुमार पाठक यांचे मत
पुणे : बहमनी साम्राज्याच्या १९१ वर्षांच्या राजवटीचे दूरगामी परिणाम आपल्यावर झाले. मराठी भाषेत अनेक फारसी शब्द आले. पेशवा, बक्षी, फडणवीस अशी आडनावे आली. भाषा, वेशभूषा, सैन्य व्यवस्था, शासन व्यवस्था यामध्ये अामूलाग्र बदल झाले. परकीय आक्रमणे हे केवळ २ सुलतानापुरते मर्यादित नव्हते. तर ते खूप मोठे सांस्कृतिक आक्रमण होते त्याचे परिणाम आजही आपण भोगत आहोत, असे मत इतिहास अभ्यासक जयकुमार पाठक यांनी व्यक्त केले.
बहमनी राजवटीचे वैशिष्ट्य म्हणजे १९१ वर्षे अल्पसंख्याकांनी बहुसंख्याकांवर राज्य केले. त्यांची परंपरा, संस्कृती पूर्ण वेगळी असली, तरी राज्यकर्ते यशस्वी ठरले. त्यांची राजवट इतकी प्रदीर्घ काळ टिकण्याचे कारण म्हणजे त्यांनी गावगाडा व्यवस्थेला कधीही धक्का लावला नाही.
जयकुमार पाठक
डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे आणि इतिहास संस्कृती कट्टा यांच्या वतीने ‘बहमनी साम्राज्याचा इतिहास’ या व्याख्यानाचे आयोजन सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे करण्यात आले होते. यावेळी जयकुमार पाठक बोलत होते. इतिहास अभ्यासक मंदार लवाटे, विद्याचरण पुरंदरे, सचिन जोशी, योगेश गायकर, संदीप परांजपे, महेश फळणसंकर, गोपाळ जोशी, चिंतामणी केळकर, विशाल खुळे,भासमती सोमण यावेळी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी याने बहमनी साम्राज्याची स्थापना केली. तुघलकांच्या काळात जे अत्याचार झाले ते बहमनी राजवटीत झाले नाहीत. बहमनी राजवटीला हिंदू आणि मुस्लिम यांचा पाठिंबा मिळाला. धार्मिक बाबींमध्ये बहमनी सुलतानांनी ढवळाढवळ केली नाही तसेच शियाबुद्धीन अहमद वगळता कोणीही धर्मांतर करायला सक्ती केली नाही. त्यामुळे लोकांचा विश्वास बहमनी राजवटीत होता. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी प्रास्ताविक केले. विद्याचरण पुरंदरे यांनी आभार मानले.